Tuesday, July 19, 2011

दोन स्वप्न:

एकात  मी  खूप  छान  गात  होते. म्हणजे  मी  कुठेतरी  बसले  होते  आणि  गुणगुणत  काम  करत  होते. आणि  अचानक  मोठ्यानी  गायला  लागले.  आणि  आजूबाजूचे  लोक  आश्चर्याने  बघू  लागले. मी  मस्त च  गात  होते.  दोन  मित्र  एकदम  डोकावले  आणि  कोण  गातय  ते  बघायला  लागले.  मग  मी  गप्प  चुप्प  बसले.


दुस-या  स्वप्नात  मी  एका  scientists च्या  टीमला  भेटले. आणि  nuclear power वरती  त्यांना  lecture दिले. ते  nuclear energy कशी  चांगली  ते  मला  पटवून  देत  होते.  मग  मी  त्यांच्याशी  वाद  घातला.  land acquisition, displacement पासून  ते  त्याची  technology कशी  full-proof नाहीये आणि  भारता सारख्या  गरीब  देशाला  कस  ते  सगळ  परवडणार  नाहीये  वगैरे  सांगत  भांडले.  म  संध्याकाळी  कायतरी  कविता  वाचनाचा  कार्यक्रम  करायला  ते  scientists निघून  गेले.

modern morality

I was discussing Locke's concept of 'Modern Morality' with a friend... 

o_O

Thursday, August 5, 2010

a dream within a dream within a dream

मुंबई. माझं आत्ताच घर. सकाळची वेळ. मी माझ्या खोलीत कपडे घडी करतेय. कपड्यांचे ढीग आहेत. तेवढयात मावशी खोलीत येते आणि म्हणते, ' अग, उशीर होतोय तुला ऑफिसला जायला. नंतर कर ते.' मी 'हो, हो ' म्हणते आणि परत कपडे घडी करायला लागते... कितीही घडी केले तरी कपडे संपतच नाहीयेत...

-cut to - 

एका कपाटामधलं माझं सामान गोळा करतेय... कपडे घडी करून मी सुटकेस मध्ये भरतेय... ही एक वाडा सदृश चाळ. मध्ये चौक आणि चारी बाजूंनी तीन माजली इमारत. एका खोलीत मी एका मध्यमवयीन जोडप्याबरोबर राहतेय. ते घर आता मी सोडून जाणारे त्यामुळे सामानाची बांधाबांध चालू आहे. तेवढयात माझं लक्ष बाल्कनी मध्ये अडगळीच सामान ठेवलंय तिकडे जात. तिथे एक भरलेलं पोतं आहे... आणि दुर्गंधी पसरलीये... मी विचारते तर ते दोघ मला सांगतात की त्यांनी त्यांच्या म्हाता-या  आईला मारून पोत्यात भरून ठेवलंय. मी म्हणते की 'अहो त्याची विल्हेवाट लावा.. नायतर आजूबाजूला वास पसरेल आणि शेजार पाजा-यांना  कळेल तुम्ही कुणाला तरी मारलाय ते .' असं म्हणून मी माझं सामान घेऊन खाली उतरते, चौक ओलांडून पुन्हा वर चढते आणि मुख्य दरवाज्यातून खाली उतरते. सामान ठेवते आणि उरलेलं सामान आणायला परत मागे जाते. बघते तर त्या दोघांनी पोतं हलवायला सुरुवात केलीये. मी माझं सामान हलवतीये. मला लवकरात लवकर तिथून निघायचं आहे.  मी पुन्हा माझं सामान ठेऊन परत येते तोवर त्यांनी ते पोतं चौक ओलांडून पलीकडे जिन्यावर आणून ठेवलंय. मी जोरात त्याला लाथ मारते आणि पोतं लोखंडी शिडीवरून खाली ढकलून देते. ते दोघ घाई घाईनी खाली उतरतात. चाळी मागे असलेल्या एका मोठ्या कचरा कुंडीच्या दिशेनी पोतं घेऊन जायला लागतात. मी परत येते आणि माझं सामान परत आवरायला लागते. ते दोघही थोड्या वेळानी परत येतात. मला सांगतात की ते पोतं कच-यात  टाकून आलेत. आता कुणाला काही कळणार नाही. मी घाबरून तिथून निघते, चौक ओलांडते, वर चढते... परत मुख्य दरवाज्यातून खाली उतरते... तर आजूबाजूचे लोक गोळा व्हायला लागलेत... 

-cut to-

मुंबई. मैत्रिणीच घर. बरेच मित्र-मैत्रिणी जमलेत.  खूप वर्षांनी एकमेकांना भेटतोय आम्ही.  मी हे  स्वप्न सगळ्यांना सांगतीये. तेवढयात दारावर टकटक होते. कुठल्यातरी जुन्या हिंदी गाण्याची धून वाजते दारावर. मी दार उघडते आणि एक मित्र बाहेर उभा आहे. साधारण चाळीशी ओलांडलेली, केस थोडे थोडे पांढरे झालेले, हातात एक पिशवी आणि जाकीट घातलेलं. मग मी मागे वळून आश्चर्यानी सगळ्यांकडे बघते. आम्ही सगळेच त्याच वयाचे आहोत साधारण... मी पुन्हा त्याच्याकडे बघते तर हा पठ्ठा मंद हसत हसत माझ्याकडे बघत उभाय...




Thursday, August 6, 2009

एका छोट्याश्या घराची गच्ची...

मी आणि आणखी काही जण...

गच्चीत काही वस्तू मांडून ठेवल्यात...

ते घर आणि ती गच्ची...

बडोद्यातल्या एका जुन्या घराची आठवण करून देणारं...

अचानक जोराचा वारा नि वादळ सुरु होतं...

गच्चीत टेबलावर ठेवलेल्या वस्तू मी गोळा करायला लागते तर त्या उडून जायला लागतात

म् आम्ही सगळे घाईघाईनी आत जायला लागतोतर मी एकदम हवेत उडायला लागते...

आणि दरवाजातून आत शिरतानाच माझं बर्फात रूपांतर होऊ लागतं...

मागून सगळे ओरडतायत... 'लवकर आत जा' म्हणतायत...

पण मी हलूच शकत नाहीये...मी एक बर्फाचा ठोकळा बनत चाललीये...

टणक नि थंड ...

Wednesday, July 29, 2009

trapped!

एका मित्राला आणि मला गुंडांनी पकडलंय. मी आतल्या खोलीत झोपलीये. बाहेर येऊन बघते तर मित्राला दोरीनी छताला टांगून ठेवलंय. मी कानोसा घेते...गुंड आजूबाजूला नाहीयेत याची खात्री झाल्यावर तिथून हळूच सटकायचा विचार करतेय... आवाज न करता दरवाजा उघडते तर तो मित्र एकदम दचकतो आणि ओरडतो, "कैसी दोस्त है? छोडके जा राही है? भूख लागी है, कुछ खाने को ले आ..." मी त्याला समजावते की मी आपल्या सुटकेचाच प्रयत्न करतीये वगैरे...!

त्याच्यासाठी खायला आणायला बाहेर पडते. चढ उताराचा रस्ता... एक कार दिसते. मी कारमध्ये बसून कार चालवायला लागते. पण तिचा फार आवाज होतोय...गुंडांना ऐकू गेलं तर...? मला भीती वाटायला लागते... मग मी अजिबात आवाज न करणारी कार शोधायला लागते... थोड्या वेळानी कंटाळून परत येते... दोरी सैल करून मित्राला सोडवते... आणि आम्ही धडपडत तिथून बाहेर पडतो...

bomb blast

PMT बस मधून मी कुठेतरी चाललीये. उजवीकडे सिंहगड दिसतोय. अचानक सगळ्यांचं एका बाजूला लक्ष जातं. फटाक्यांचे stalls लागलेत. दुकानदार सामान गोळा करतायत. stalls गुंडाळताहेत. कारण बॉम्ब स्फोट होणार अशी अफवा आहे. तेवढ्यात फटाक्यांच्या stalls मध्ये आग भडकते ... आई मागच्या सीट वर बसून किंचाळतीये...

Saturday, March 7, 2009

chameleon dream

घरी काका -काकू जेवायला आलेत॰ मी त्यांच्याशी गप्पा मारायला लागते तिथे माझा मित्रही (जो त्यांचा मुलगा आहे॰!) असं गृहीत धरून॰ त्याच्या ऐवजी एक अनोळखी मुलगी कुठूनतरी उपटली आहे॰ म् मी आत येते तर तिथे तो मित्र बसलाय आधीपासूनच ! आणि जमिनीवर एक सरडा फिरतोय॰ पिवळसर हिरवट रंगाचा आणि त्यावर बारीक चौकटीची नक्षी, त्यावर लाल ठिपके॰ त्यानी नागासारखा फणा काढलाय आणि माझ्याकडे झेप घेतोय... मी ओरडते॰ बाबा बाहेर बसलाय, त्याला हाका मारते॰ त्याला सांगते आत एक सरडा आलाय॰ बाबा विचारतो, 'त्याचा रंग आवळ्यासारखा आहे का?' ... मला कळत नाही याला कसा बाहेर बसून रंग ओळखता आला...?

आणि माझी आजी सारखी हाका मारतीये, झोपेतून उठवतीये... नूपरे, उठ, चहा कर ! ...

'arti'-fact!

एक जुनाट लाकडी इमारत॰ तिथे एका मोठ्या प्रदर्शनाची तयारी चालू आहे॰
तैलचित्र करणारे एक महान कलाकार त्यांचं चित्र घेऊन येतात॰ मी ते चित्र भिंतीवर लावायचा प्रयत्न करते, पण काही केल्या जमत नाही॰ मग मी कुणालातरी सांगते तर तो पठ्ठा ते चित्र छतावरच्या एक खिळ्याला टांगतो॰
त्याच हॉल मध्ये माझा एक मित्र installation (मांडणी शिल्प) लावतो आहे॰ त्याने मांडणी शिल्प म्हणून तिथे एका लोखंडी पलंगावर गादी, ऊशी आणि पांघरूण ठेवले आहे॰
बाजूच्या एका अंधा-या खोलीमध्ये अजून एका artist नी काही छायाचित्रं मांडली आहेत॰ काही लाकडी ठोकळे ठेवलेले आहेत॰ ती स्वत: चित्र विचित्र पोशाखात बाल्कनीत विचारमग्न अवस्थेत बसली आहे॰ त्या खिडकीतून सुटून हळूच काही किरणं आत येताहेत... तेवढाच काय तो सूर्यप्रकाश॰
मग तिथे एक सामाजिक कार्यकर्त्या बाई उगवतात, त्यांनाही प्रदर्शनात काहीतरी मांडायचं असत॰ तर मी त्यांच्या शेजारी विळीवर बसून काहीतरी चिरायला लागते...

Saturday, February 14, 2009

A, B, S & ...!

एक ऑफिस सदृश जागा ... मी एका soft board वर visiting cards चिकटवतीये॰ ब्रशनी त्यावर भरपूर डिंक लावतीये, इतका की soft board वरुन त्याचे ओघळ वाहताहेत॰ ती - १ मला समजावतीये, " अगं, इथे बाहेरून येणारे जे लोक आहेत त्यांची visiting cards लावायची॰ आपलीच नव्हे! " मला मात्र त्याचं काहीच नाही। ती-२ मला डिंक वाया घालवल्या बद्दल रागावातीये॰

बाहेर जोराचा वारा अणि पाउस सुरु झालाय॰ ती-२ अणि ती-३ जाऊन कुठुनतरी दोन लाकडी शिल्पं घेउन येतात॰ त्यातलं एक गाढवाचं डोकं आहे अणि दुसरं अजून काहीतरी (काय ते मला नक्की आठवत नाही..!) ते नेवून बाल्कनी मध्ये ठेवतात तर ते भिजून खराब ! लाकूड कुजायला लागलंय॰ मग या सगळ्या पोरी गायब !

मी दमून गादीवर बसते ॰ फरशीवरच गादी टाकलीये... अचानक कुठुनतरी 'तो' उगवलाय... आम्ही गादीवर बसलोय... अणि त्या गादीखालून एकाएकी एक झुरळ बाहेर पडतं... मग अजून एक जरासं मोठं... म् त्याहून मोठं ...! काळसर ब्राउन रंगाची उडणारी मोठाली झुरळं ... ती रांग वाढतच चालली आहे... न संपणारी झुरळं ...समोरच्या कपाटाच्या दिशेनी जाणारी त्यांची रांग... गादीवर बसलेले आम्ही दोघं... आश्चर्यचकित होउन त्यांचं निरीक्षण करणारे...

Friday, February 13, 2009

Sa. Na. Ma.

सडक नाटक मंडळीँचा पथनाट्याचा प्रयोग॰ एक मोठ्या पटांगणात लोक जमलेत॰ बहुतेक सर्व पुरोगामी मंडळी आली आहेत॰
नाटकातील कलाकार प्रयोग सुरु करतात॰ मध्ये फेर धरून गाणं सुरु होतं॰ मी मात्र अजुन बाहेरच उभी आहे ॰ मी पटकन त्यांच्या बरोबर गाणं म्हणायला गोलात शिरते तर कुणीतरी मला हटकतं आणि बाहेर काढतं॰
मग नाटक सुरु होतं॰ सूत्रधार १ त्याचा संवाद म्हणतो आणि मग सूत्रधार २ ला तिचा संवाद म्हणायचा असतो॰ पण ती अडखळते, संवाद विसरते॰ अचानक सगळेच जण पूर्ण नाटकच विसरून जातात॰ कुणालाच काहीच आठवत नाही॰
एक लांबलचक शांतता ॰ ॰ ॰
सगळेजण एकदम लवून नमस्कार करतात आणि माफी मागतात॰
नाटक तिथेच थांबतं॰ ॰ ॰